ह्या वर्षीचा पवित्र श्रावण महिना २२ जुलै पासून चालू झाला आहे. श्रावणी सोमवार २०२४ तारखा २२ जुलै, २९ जुलै, ५ ऑगस्ट, १२ ऑगस्ट, १९ ऑगस्ट अशा आहेत. उत्तर भारतात व महाराष्ट्रात श्रावण वेगवेगळ्या तारखांना सुरू होत असतो.
महाराष्ट्र आणि दक्षिणी अमंता कॅलेंडरनुसार, चांद्रमास अमावस्येला संपतो, म्हणून महाराष्ट्रात श्रावणाला ५ ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. यानुसार, महाराष्ट्रात श्रावण मास ५ ऑगस्ट ते २ सप्टेंबर पर्यंत असेल.
श्रावण महिना माहिती
संपूर्ण श्रावण महीना अत्यंत पवित्र मानला जातो. तर या महिन्यातील प्रत्येक सोमवारालाही तितकेच महत्व आहे. शिवभक्त श्रावणी सोमवारांना मनोभावे उपवास करून ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेतात, शिवमंदिरांमध्ये अभिषेक करतात.
काही शिवभक्त भगवान शिव शंकरांना प्रसन्न करण्यासाठी संपूर्ण श्रावण महीना उपवास करतात. ते श्रावण महिना अत्यंत कडक पाळतात. म्हणजेच ब्रह्मचर्य राखून आणि सात्विक जीवनशैली अंगीकारून भगवान शिवाचा सन्मान करतात.
त्यामध्ये संपूर्ण महिनाभर पूजा करणे, मंत्र जप करणे, ध्यान करणे, तामसिक अन्न, मद्य, दुग्धजन्य पदार्थ टाळणे आणि मंदिरांना भेट देणे, स्वच्छता, परोपकार, दयाळूपणा आणि सकारात्मक बोलण्याला प्राधान्य देणे या सर्व गोष्टींचा समावेश असतो.
श्रावण महिन्यातील पूजा ही फलदायी मानली जाते. कारण हा महिना महादेवांच्या उपासनेचा असतो. म्हणून मनोकामना पूर्ण होण्यासाठी शिवभक्त नित्यनेमाने मनोभावे पूजा करतात.
श्रावण महिना महत्व
Importance of Shravan Month: ” श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे, क्षंणात येते सर सर शिरवे क्षंणात फिरुनि ऊन पडे ” … या ओळी प्रमाणे श्रावण महिन्यात कधी ऊन तर कधी सावली आणि त्यात मधेच थोडा थोडा पाऊस पडत असतो.
श्रावण महिन्यात सगळीकडे आनंदमय वार्तावरण असते. कारण सगळीकडे पावसाच्या हलक्या सरी, पाण्यांनी भरलेल्या नद्या, धबधबे, सगळीकडे हिरवळ, तसेच वेगवेगळ्या प्रकारची फुलेही सर्वत्र उमलेली दिसतात. निसर्गचक्र आणि परंपरा या दोन्ही दृष्टीने श्रावण महिन्याला खूप महत्व आहे.
श्रावणाचे वर्णन चार्तुमासातील श्रेष्ठ महिना म्हणून केले जाते. आषाढी अमावस्या म्हणजेच दीपपूजन (दिव्याची आवस) झाली की व्रत वैकल्यांना सुरुवात होते आणि संपूर्ण वातावरणही बदलते. या महिन्यात संपूर्ण शाकाहार आहारास प्राधान्य दिले जाते.
श्रावण आणि श्रवण यांचा अनुबंध या महिन्यात दिसून येतो, कारण या महिन्यात शिवभक्त भजन, कीर्तन, प्रवचन, तसेच सप्ताहांचे आयोजन करतात. प्रत्येक मंदिरात, घरात, महादेवाचा जप, मंत्र, रुद्राभिषेक केला जातो. म्हणून हा महिना श्रवणभक्तीचा महिना म्हणून ओळखला जातो.
प्रत्येक श्रावणी सोमवारी महादेव मंदिरात महादेवाचे पूजन एका विशिष्ठ पद्धतीने केले जाते. कारण श्रावण महिन्यात शिव आणि पार्वती यांच्या पूजनाचे महत्व हिंदू ग्रंथांमध्ये अधिक प्रमाणात वर्णन केले आहे.
या पवित्र महिन्यात सण व्रतवैकल्ये जास्त असतात. म्हणूनच श्रावण महिन्यात मांसाहार पूर्णपणे वर्ज्य मानला जातो. श्रावणी सोमवार, प्रदोष याच महिन्यात असतात. पहिल्या सोमवारची सुरुवात शिवामूठच्या व्रताने होते.
दर सोमवारी तांदूळ, तीळ, मूग, जव आणि सातू अशा क्रमाने शंकराच्या पिंडीवर मुठीने धान्य वाहिले जाते. तसेच महादेवांना आणि नंदीला तांदूळ, बेलपत्र, फुले, व धोतरा, अर्पण करतात.
श्रावणातील सोमवार प्रमाणेच मंगळवार सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. श्रावणी मंगळवारी नववधु तसेच इतर महिला मंगलागौरीचे व्रत करतात. याच दिवशी महिला हळदी कुंकू कार्यक्रम, खेळ, मनोरंजन कार्यक्रम आयोजित करतात.
श्रावण महिन्यातील सण
Festivals in the month of Shravan: श्रावण महिना विशेषत: महिलांसाठी खूप खास असतो, कारण या महिन्यात भरपूर सण येतात. श्रावणातील पहिलाच सण म्हणजे मंगळागौर होय. त्यानंतर शुक्ल पक्षातील पंचमीला नागपंचमी हा सण असतो.
तर शुक्ल पक्षातील पौर्णिमेला ‘नारळी पौर्णिमा’ हा सण येतो. आणि सगळ्यात शेवटी गोकुळ अष्टमी हा सण असतो. हे सगळेच सण महिलांसाठी खूप खास आहेत.
हे वाचा रक्षाबंधन माहिती: https://www.ejanseva.com/raksha-bandhan-narali-purnima/
श्रावण महिन्यातील धार्मिक कार्ये
१) प्रत्येक सोमवारी – शिवपूजन
२) प्रत्येक मंगळवारी – मंगलागौरीचे पूजन
३) प्रत्येक बुधवारी – बुधाचे पूजन
४) प्रत्येक गुरुवारी – बृहस्पतीचे पूजन
५) प्रत्येक शुक्रवारी – देवीचे पूजन
६) प्रत्येक शनिवारी – शनि-मारुति-अश्वत्था(पिंपळा)चे पूजन
७) प्रत्येक रविवारी – आदित्याचे पूजन
श्रावण महिन्यातील विशेष दिवस
– श्रावण शुक्ल पंचमी (नागपंचमी) – नागपूजन
– श्रावणी पौर्णिमा (नारळी पौर्णिमा, राखी पौर्णिमा, पोवती पौर्णिमा)
– श्रावणी (वैदिकांसाठी)
– श्रावण कृष्ण सप्तमी-अष्टमी (श्रीकृष्ण-जन्माष्टमी)
– श्रावणी अमावस्या (पिठोरी अमावस्या)
हे देखील वाचा : गोकुळ अष्टमी उत्सव माहिती