एक वर्षाचे विमा संरक्षण असणारी ही अपघात विमा योजना आहे. या योजनेचे दरवर्षी नूतनीकरण गरजेचे आहे. बँका व सार्वजनिक क्षेत्रातील इन्शुरन्स कंपन्यांच्या सहयोगाने ही योजना राबविण्यात येणार आहे. 18 ते 70 वयोगटातील बँकेतील बचतखातेधारक या योजनेत सहभागी होऊ शकतील.
एका व्यक्तीची अनेक बचत खाती असल्यास कुठल्याही एका बचत खात्यामधून हा विमा उतरवू शकेल. विमा उतरविणाऱ्या व्यक्तीचा आधार क्रमांक पायाभूत मानला जाणार आहे. या योजनेचा कालावधी 1 जून ते 31 मे असा आहे. योजनेच्या नूतनीकरणाचा अर्ज 31 मे पर्यंत द्यावा लागणार आहे. विमा हप्ता बँक खात्यात परस्पर नावे टाकला जाईल. पुढील वर्षाच्या योजनेत सहभागी होण्यासाठीचा काळ सरकार सुरुवातीला 3 महिने पर्यंत (30.11.2015) वाढवू शकते.
अपघात विमा भरपाई
मृत्यू झाल्यास दोन लाख रूपये, दोन्ही डोळ्यांची संपूर्ण आणि बरी न होणारी हानी, दोन्ही हात किंवा दोन्ही पाय निकामी होणे, एक डोळा आणि एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास दोन लाख रूपये, एका डोळ्याची संपूर्ण आणि बरी न होणारी हानी किंवा एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास एक लाख रूपयांचे विमा संरक्षण मिळणार आहे.
यासाठी विमा हप्ता 12 रूपये प्रती व्यक्ति, प्रती वर्ष राहिल. बँक बचत खात्यात परस्पर नावे टाकला जाईल. विमा धारकाने वय वर्षे 70 पूर्ण केल्यावर, बँकेच्या बचत खात्यात विमा हप्ता नावे टाकण्यास पुरेशी शिल्लक नसल्यास बँक खाते बंद करून विमा संरक्षण संपुष्टात येईल. तांत्रिक अडचणींमुळे संपुष्टात आलेली विमा पॉलिसी अटींची पूर्तता केल्यानंतर पुन्हा चालू करता येईल.
अटल पेन्शन योजना ही निवृत्ती नंतर दरमहा ठराविक परतावा देणारी एक सरकारी पेन्शन योजना आहे. ही योजना मुख्यतः असंघटित क्षेत्रातील नागरिकांसाठी, ज्यांच्यासाठी कुठलीही पेन्शन योजना उपलब्ध नाही, अशासाठी लाभदायक आहे. बँका व पेन्शन निधी विनियामक आणि विकास प्राधिकरण यांच्या सहयोगाने ही योजना कार्यान्वित होणार आहे.
18 ते 40 वयोगटातील असंघटित क्षेत्रातील सर्व बचत बँक खातेधारक या योजनेत सहभागी होऊ शकतील. 18 वर्षे वयाच्या व्यक्तीने दरमहा 42 रूपये भरल्यास या व्यक्तीला वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर एक हजार रूपये दरमहा पेन्शन मिळू शकेल. याच धर्तीवर दरमहा 210 रूपये भरल्यास पाच हजार रूपये दरमहा पेन्शन मिळू शकेल. दर महिन्याचे योगदान बचत खात्यातून परस्पर नावे टाकण्याची सोय आहे.
या योजनेत ग्राहकाच्या योगदानाबरोबरच पहिली पाच वर्षे (2015-16 ते 2019-20) सरकारचेही योगदान राहणार आहे. हे योगदान ग्राहकाच्या एकूण योगदानाच्या 50 टक्के किंवा एक हजार रूपये यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढी असणार आहे. ज्या ग्राहकांसाठी कुठलीही वैधानिक सामाजिक सुरक्षा योजना उपलब्ध नाही आणि जे ग्राहक आयकर दाते नाहीत अशाच ग्राहकांना हे योगदान मिळणार आहे.
ग्राहकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नी किंवा पतीस ही पेन्शन चालू राहील. दोघांचाही मृत्यू झाल्यास त्यांनी नामांकित केलेल्या व्यक्तीस सर्व जमा रक्कम एक रकमी परत करण्यात येणार आहे.
एक वर्षाचे विमा संरक्षण असणारी ही आयुर्विमा योजना आहे. या योजनेचे दरवर्षी नूतनीकरण आवश्यक आहे. बँका व भारतीय आयुर्विमा महामंडळ यांच्या सहयोगाने या योजना चालविण्यात येणार आहे. 18 ते 50 वयोगटातील सर्व बचत बँक खातेधारक या योजनेत सहभागी होऊ शकतील.
एकाच व्यक्तीची अनेक बचत खाती असल्यास कुठल्याही एका बचत खात्याद्वारे हा विमा काढता येणार आहे. विमा काढणाऱ्या व्यक्तीचा आधार क्रमांक पायाभूत मानण्यात येणार आहे.
योजनेचा कालावधी दर वर्षी 1 जून ते 31 मे राहणार आहे. विमा हप्ता बँक खात्यात परस्पर नावे टाकला जाणार आहे. पुढील वर्षाच्या नूतनीकरणाचा अर्ज 31 मे पर्यंत देणे आवश्यक राहील. योजनेत सहभागी होण्यासाठीचा काळ सरकार सुरुवातीला 3 महिने पर्यंत (30.11.2015) वाढवू शकेल.
विमाधारकाचा कुठल्याही कारणाने मृत्यू झाल्यास त्याच्या वारसास 2 लाख रूपये भरपाई मिळणार आहे. या योजनेचा विमा हप्ता 330 रूपये प्रती व्यक्ति, प्रती वर्ष राहणार आहे. विमा धारकाने वय 55 वर्षे पूर्ण केल्यानंतर बँकेच्या बचत खात्यात विमा हप्ता नावे टाकण्यास पुरेशी शिल्लक नसल्यास बँक खाते बंद करून विमा संरक्षण संपुष्टात येणार आहे.
काही अटींची पूर्तता केल्यानंतर विमा पॉलिसी पुन्हा चालू करता येणार आहे.