Margashirsha 2023: मार्गशीर्ष महिना महत्व गुरुवार व्रतकथा मराठी माहिती

मार्गशीर्ष महिना गुरुवारी श्री महालक्ष्मीची या पद्धतीने करा व्रत पूजा होईल माता लक्ष्मी प्रसन्न पूर्ण करेन तुमच्या सर्व मनोकामना.

By Reshma
10 Min Read
Margashirsha 2023: मार्गशीर्ष महिना महत्व गुरुवार व्रतकथा

मित्रानो येत्या १३ डिसेंबर पासून मार्गशीर्ष महिना चालू होत आहे. हा महिना खूप पवित्र मानला जातो. कारण  हा महिना मराठी वर्षातला नववा महिना आहे. आणि तो साधारण नोव्हेंबर,डिसेंबर अशा दोन्ही महिन्यात मिळून येतो. मार्गशीर्ष महिन्याला अग्रहायण मास असेही म्हणतात.

या काळामध्ये पाऊस पूर्णपणे थांबलेला असतो. हवामान खूप शीतल आणि स्वच्छ असते. सर्वत्र उजेड असल्यामुळे सुखकर असते. त्यामुळे मार्गशीर्ष महिना हा अतीशय उत्तम महिना आहे असे श्रीकृष्णाने भगवद्‌गीतेत सांगितले आहे.

मार्गशीर्ष मास हा केशव मास म्हणूनही ओळखला जातो. मार्गशीर्ष मास हा भगवान दत्तात्रेयांना समर्पित आहे. या मासात महिला श्री महालक्ष्मीचे व्रत करतात. म्हणून या मासाचे पालकत्व श्री विष्णू यांच्याकडे असते.

मार्गशीर्ष महिन्यातील महत्त्वाचे दिवस

शुक्ल प्रतिपदा : देव दीपावली – मार्तंड भैरव षड्रात्रोत्सव प्रारंभ (चंपाषष्ठीच्या नवरात्राची सुरुवात)

शुक्ल षष्ठी : चंपाषष्ठी. मार्तंड भैरव नवरात्राचा शेवटचा दिवस.

शुक्ल सप्तमी : मित्र सप्तमी

शुक्ल नवमी : महानंदा नवमी

शुक्ल अष्टमी : बुधाष्टमी

शुक्ल एकादशी : मोक्षदा एकादशी, गीता जयंती

पौर्णिमा : दत्त जयंती, अन्नपूर्ण जयंती

कृष्ण एकादशी : सफला एकादशी

अमावास्या : वेळ अमावास्या

आज मार्गशीर्ष प्रतिपदा देवदीपावली,मार्तंड भैरव (मल्लारी खंडोबा) षड्रात्रोत्सव प्रारंभ

नमो मल्लारीं देवाय भक्तानां प्रेमदायिने ।
म्हाळसापतीं नमस्तुभ्यं मैरालाय नमो नमः ।।
मल्लारीं जगतान्नाथं त्रिपुरारीं जगद‌्गुरूं ।
मणिघ्नं म्हाळसाकांतं वंदे अस्मत् कुलदैवतम् ।।

महाराष्ट्रात खंडोबा आणि कर्नाटकात मैलार या नावाने ओळखला जाणारा हा लोकदेव कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अनुबंधाचे एक प्रकट प्रतीक आहे. ‘मल्लारी मार्तंड भैरव’ हे त्याचे संस्कृत नाव. या देवतेची लोकप्रियता एवढी व्यापक आहे की, धनगर, रामोशांपासून देशस्थ ब्राह्मणांपर्यंत समाजाच्या सर्व थरांत त्याची उपासना प्रचलित आहे.

महाराष्ट्रातील खंडोबा चंपाषष्ठी उत्सवाच्या दिवशी हे एक काम जरूर करा आणि कुलदैवताला या पद्धतीने प्रसन्न करा.

‘खंडोबाचे नवरात्र’ हे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी असे सहा दिवस साजरे केले जाते. हा खरा षड्रात्रोत्सव असतो. मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी म्हणजेच चंपाषष्ठी, या दिवशी खंडोबा ऋषींच्या विनंतीला मान देऊन मणी-मल्लाचा वध करून लिंगद्वय रूपाने प्रगट झाले. नवरात्राचे पाच दिवस उपवास करून सहाव्या दिवशी तो सोडतात. सहा दिवस देवापुढे नंदादीप ठेवतात. देवाला बेल, दवणा व झेंडूची फुले फार प्रिय म्हणून ती आठवणीने वाहतात.

खंडोबाच्या उपासनेत भंडारा (हळदीची पूड) फार महत्त्वाचा आहे. खंडोबाच्या कुलधर्मासाठी व चंपाषष्ठी या दिवशी ठोम्बरा (जोंधळे शिजवून त्यात दही व मीठ घातलेले), कणकेचा रोडगा, वांग्याचे भरीत, पातीचा कांदा व लसूण हे पदार्थ नैवेद्यात असतात. देवाला नैवेद्य देण्यापूर्वी तळी भरण्याचा विधी असतो.

तळी भरणे म्हणजे एका ताह्मणात विड्याची पाने, पैसा, सुपारी, भंडारा व खोबरे हे पदार्थ ठेवून ते ताह्मण “सदानंदाचा येळकोट’ किंवा “येळकोट येळकोट जय मल्हार’ असे मोठ्याने तीन वेळा म्हणत उचलतात, नंतर दिवटी-बुधली घेऊन आरती करतात. देवाकडे तोंड करून भंडारा व खोबरे उधळून प्रसाद वाटला जातो.

श्री दत्तात्रेय जयंती

मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्त गुरूंचा जन्म झाला म्हणून त्या दिवशी दत्त जयंती साजरी केली जाते. दत्त जयंतीच्या आधी दत्तात्रेयांचे भक्त सात दिवस गुरुचरित्राचे वाचन करतात, त्याला गुरूचरित्राच्या परायणाचा सप्ताह असे म्हणतात.

ठिकठिकाणच्या दत्त मंदिरामध्ये दत्त जयंतीच्या दिवशी भजन,कीर्तन आदी कार्यक्रम आयोजित केले जातात. तसेच या दिवशी दत्त गुरूंची पूजा, धूप, दीप लावून आरती करून सुंठवडा प्रसाद म्हणून दिला जातो. महाराष्ट्रात औदुंबर,नरसोबाची वाडी, गाणगापूर,नारायणपूर इ. दत्त क्षेत्रात दत्त जयंतीचा उत्सव मोठ्या प्रमाणावर केला जातो.

दत्त जयंती विषयी अधिक माहिती पाहा : Dattatreya Jayanti 2023: दत्त जयंती मराठी माहिती वेळ,पूजा विधी,शुभेच्छा स्टेटस

मार्गशीर्ष महिना गुरुवार व्रत कथा व पूजा विधी

मार्गशीर्ष महिन्यातल्या प्रत्येक गुरुवारी महिला श्री महालक्षमी चे व्रत करतात. आपल्या घरात सुख शांती आरोग्य आयुष्य चांगले राहो तसेच घरामध्ये धनधान्य आणि सुबत्ता रहावी यासाठी हे व्रत केले जाते. हे व्रत महिला स्वत: घरी करतात. जे लोक हे व्रत करणार असतील त्यांनी प्रत्येक गुरुवारी उपवास करावयाचा असतो.

ज्या ठिकाणी पूजा मांडायची असेल त्या ठिकाणी रांगोळी काढावयाची असते. त्यावर चौरंग ठेऊन एक ताम्हण ठेवून त्या ताम्हनात अक्षता ठेऊन त्यावर एक कलश ठेवून त्या कलशामध्ये पाणी, दुर्वा, द्रव्य टाकून त्याच्यावर विड्याची पाने गोलाकार ठेवून त्यावर श्रीफळ ठेवलं जातं. कलशाला आणि नारळाला हळदीकुंकू लावून पूजा केली जाते. काही ठिकाणी श्रीफळावर मंगळसूत्र घालून वर देवीचा मुखवटाही ठेवला जातो.

लक्ष्मीमातेची विधिवत पूजा करून तिला फुलांची वेणी,आणि सौभाग्यच वाण दिले जाते आणि या व्रताचा महिमा सांगणारी जी पोथी आहे तिचे वाचन केले जाते. गोड शिऱ्याचा नैवेद्य दाखविला जातो आणि रात्री हा उपवास सोडला जातो.

या व्रताच्या शेवटच्या गुरुवारी पाच सुवासिनी आणि पाच कुमारिकांना घरी बोलावून त्यांना हळदकुंकू लावून आपल्या ऐपतीप्रमाणे  त्यांना भेटवस्तू देऊन महालक्ष्मी व्रताची महती सांगणारे एक पुस्तक भेट देऊन त्यांचा मानसन्मान आणि आदर सत्कार केला जातो आणि त्यांना देवीचा प्रसाद दिला जातो.

श्री. महालक्ष्मीची अनेक नावे आणि अनेक रूपे आहेत. पार्वती,सिंधुकन्या,महालक्ष्मी,लक्ष्मी,राजलक्ष्मी,गृहलक्ष्मी,सावित्री, राधिका रासेश्वरी, चंद्रा, गिरिजा, पद्मा, मालती, सुशिला, अशा विविध नावांनी श्री. महालक्ष्मी ओळखली जाते. हे महालक्ष्मीचे व्रत केले की करणाऱ्याचे मनोरथ पूर्ण होतात असे म्हटले जाते.

मार्गशीर्ष महिन्यातील चार गुरुवार

मार्गशीर्ष पहिला गुरुवार- १४ डिसेंबर २०२३

मार्गशीर्ष दुसरा गुरुवार- २१ डिसेंबर २०२३

मार्गशीर्ष तिसरा गुरुवार- २८ डिसेंबर २०२३

मार्गशीर्ष चौथा गुरुवार- ४ जानेवारी २०२४

हे सुद्धा वाचा – कालभैरव जयंती 2023: भगवान कालभैरवांना प्रसन्न करण्यासाठी तिथी, महत्त्व आणि पूजाविधी

श्री महालक्ष्मीची आरती –

जय देवी जय देवी जय महालक्ष्मी ।

वससी व्यापकरुपें तू स्थूलसूक्ष्मीं ॥ ध्रु ॥

 

करविरपुरवासिनी सुरवरमुनिमाता ।

पुरहर वरदायिनी मुरहर प्रियकांता । ।

कमलाकारें जठरी जन्मविला धाता ।

सहस्रवदनीं भूधर न पुरे गुण गातां । । १ । ।

जय देवी जय देवी जय महालक्ष्मी ।

वससी व्यापकरुपें तू स्थूलसूक्ष्मीं ॥ ध्रु ॥

 

मातुलिंग गदा खेटक रविकिरणीं ।

झळके हाटक-वाटी पीयुषरसपाणी ॥

माणिकरसना सुरंगवसना मृगनयनी ।

शशिकरवदना राजस मदनाची जननी । । २ । ।

जय देवी जय देवी जय महालक्ष्मी ।

वससी व्यापकरुपें तू स्थूलसूक्ष्मीं ॥ ध्रु ॥

 

ताराशक्ति अगम्या शिवभजकां गौरी ।

सांख्य म्हणती प्रकृती निर्गुण निर्धारीं । ।

गायत्री निजबीजा निगमागम सारी ।

प्रकटे पद्मावती निजधर्माचारी । । ३ । ।

जय देवी जय देवी जय महालक्ष्मी ।

वससी व्यापकरुपें तू स्थूलसूक्ष्मीं ॥ ध्रु ॥

 

अमृतभरिते सरिते अधदुरिते वारीं ।

मारीं दुर्घट असुरां भव दुस्तर तारी । ।

वारीं मायापटल प्रणमत परिवारी ।

हें रूप चिद्रुप तद्रुप दावीं निर्धारीं । । ४ । ।

जय देवी जय देवी जय महालक्ष्मी ।

वससी व्यापकरुपें तू स्थूलसूक्ष्मीं ॥ ध्रु ॥

 

चतुरानने कुश्चित कर्माच्या ओळी ।

लिहिल्या असतील माते माझे निजभाळी । ।

पुसोनी चरणतळीं पदसुमनें क्षाळी ।

मुक्तेश्वर नागर क्षीरसागर बाळी । । ५ । ।

जय देवी जय देवी जय महालक्ष्मी ।

वससी व्यापकरुपें तू स्थूलसूक्ष्मीं ॥ ध्रु ॥

महालक्ष्मी अष्टक

॥ श्री महालक्ष्म्यष्टकम् ॥

श्री गणेशाय नमः

नमस्तेस्तू महामाये श्रीपिठे सूरपुजिते ।

शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तूते ॥ १ ॥

नमस्ते गरूडारूढे कोलासूर भयंकरी ।

सर्व पाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तूते ॥ २ ॥

सर्वज्ञे सर्ववरदे सर्वदुष्ट भयंकरी ।

सर्व दुःख हरे देवी महालक्ष्मी नमोस्तूते ॥३ ॥

सिद्धीबुद्धूीप्रदे देवी भुक्तिमुक्ति प्रदायिनी ।

मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तूते ॥ ४ ॥

आद्यंतरहिते देवी आद्यशक्ती महेश्वरी ।

योगजे योगसंभूते महालक्ष्मी नमोस्तूते ॥ ५ ॥

स्थूल सूक्ष्म महारौद्रे महाशक्ती महोदरे ।

महापाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तूते ॥ ६ ॥

पद्मासनस्थिते देवी परब्रम्हस्वरूपिणी ।

परमेशि जगन्मातर्र महालक्ष्मी नमोस्तूते ॥ ७ ॥

श्वेतांबरधरे देवी नानालंकार भूषिते ।

जगत्स्थिते जगन्मार्त महालक्ष्मी नमोस्तूते ॥ ८ ॥

महालक्ष्म्यष्टकस्तोत्रं यः पठेत् भक्तिमान्नरः ।

सर्वसिद्धीमवाप्नोति राज्यं प्राप्नोति सर्वदा ॥ ९ ॥

एककाले पठेन्नित्यं महापापविनाशनं ।

द्विकालं यः पठेन्नित्यं धनधान्य समन्वितः ॥१०॥

त्रिकालं यः पठेन्नित्यं महाशत्रूविनाशनं ।

महालक्ष्मीर्भवेन्नित्यं प्रसन्ना वरदा शुभा ॥११॥

॥ इतिंद्रकृत श्रीमहालक्ष्म्यष्टकस्तवः संपूर्णः ॥

महालक्ष्मी मंत्र

लक्ष्मी देवीच्या काही खास मंत्रांबद्दल आपण जाणून घेवूयात. आमचे तज्ञ सांगतात की देवी लक्ष्मीच्या या मंत्रांचा जप केल्याने आर्थिक समस्या दूर होतात आणि पैशाशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या समस्यांपासून मुक्ती मिळते. चला तर मग जाणून घेऊया या मंत्रांबद्दल जे गरिबीसह पैशांशी संबंधित प्रत्येक समस्येपासून मुक्ती देतात.

    • श्री माता लक्ष्मी बीज मंत्र (Maa Lakshmi Beej Mantra)  – । ऊँ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ऊँ महालक्ष्मी नमः।।
    • श्री माता लक्ष्मी ध्यान मंत्र (Maa Lakshmi Dhyaan Mantra ) – ऊँ श्रीं क्लीं महालक्ष्मी महालक्ष्मी एह्येहि सर्व सौभाग्यं देहि मे स्वाहा।।
    • श्री माता लक्ष्मी कर्ज मुक्ति मंत्र  (Karj Mukti Mantra) -ऊँ ह्रीं श्री क्रीं क्लीं श्री लक्ष्मी मम गृहे धन पूरये, धन पूरये, चिंताएं दूरये-दूरये स्वाहा:। ।
    • श्री माता लक्ष्मी धन लाभ मंत्र (Dhan Labh Ke Liye Mantra) -या रक्ताम्बुजवासिनी विलासिनी चण्डांशु तेजस्विनी। या रक्ता रुधिराम्बरा हरिसखी या श्री मनोल्हादिनी॥ या रत्नाकरमन्थनात्प्रगटिता विष्णोस्वया गेहिनी। सा मां पातु मनोरमा भगवती लक्ष्मीश्च पद्मावती ॥
    • श्री माता लक्ष्मी कामना पूर्ती मंत्र (Kamana Purti Ke Liye Mantra) – श्रीं ह्रीं क्लीं ऐं कमलवासिन्यै स्वाहा।
    • श्री माता लक्ष्मी सफलता मंत्र (Safalta Ke Liye Mantra) – ॐ ह्रीं ह्रीं श्री लक्ष्मी वासुदेवाय नम:

मित्रानो वरील प्रमाणे आपण मार्गशीर्ष या पवित्र मासाची मराठी मध्ये माहिती पाहिली आहे. अश्या प्रकारे आपण श्री दत्तात्रेय, श्री महालक्ष्मी, श्री खंडोबा आणि श्री विष्णुदेव यांची उपासना आणि सेवा करून आपल्या जीवनात आर्शीर्वाद प्राप्त करू शकतो.

Share This Article
By Reshma
Follow:
नमस्कार, मी एक गृहिणी आहे आणि ब्लॉग लिहिणे हे माझे आवडते काम आहे. विविध विषयावर रिसर्च करून साध्या, सोप्या, भाषेत समजेल असे मराठी विषयात लेखन काम करणे. उपयुक्त माहिती जन-सामान्या पर्यंत पोहचवणे हे माझे उद्दिष्ट्ये आहेत. धन्यवाद.
Leave a review

Leave a review

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version