प्रत्येक वर्षी फाल्गुन कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री (Maha Shivratri) साजरी केली जाते, कारण याच दिवशी माघ वद्य चतुर्दशीला भगवान शंकर आणि देवी पार्वती यांचा विवाह झाला होता.
महाशिवरात्री या दिवसापासून सृष्टीची सुरुवात झाली असे मानले जाते. पौराणिक कथेनुसार, शिवरात्री (shivratri 2024) या दिवशी अग्निलिंगाच्या ( जे महादेवाचे विशाल रूप आहे ) उदयाने सृष्टीची सुरुवात झाली. चालू वर्षी महाशिवरात्री (Maha Shivaratri 2024) दि. ८ मार्च २०२४, वार शुक्रवार या दिवशी साजरी होत आहे.
महाशिवरात्रीची संपूर्ण माहिती
Mahashivratri Full Information Marathi: शिव ही हिंदू धर्मातील एक देवता आहे. भगवान शिव यांची भिन्न रूपे आणि भिन्न नावे प्रसिद्ध आहेत. सर्व देवी देवतांमध्ये श्रेष्ठ असल्यामुळे त्यांना “महादेव” असे संबोधले जाते. समुद्रमंथातून निर्माण झालेले विष प्राशन करून ते आपल्या कंठात साठविल्यामुळे त्यांचा गळा निळ्या रंगाचा झाला, आणि म्हणूनच त्यांना “नीलकंठ” किंवा “नीलग्रिव” म्हणतात.
समस्त प्राणीमात्रांचे व पशुंचे स्वामी असल्यामुळे त्यांना पशुपती म्हणून देखील ओळखले जाते. भगवान शिव चे भगवान शंकर हेही देवतेच्या अनेक नावांपैकी एक नाव आहे. भगवान शंकर हे या ब्रह्मांडाचे आदियोगी, प्रथम योगी, आदि गुरू, प्रथम गुरू आहेत अशी मान्यता आहे. शं करोती इति शंङ्कर: (संस्कृत शंङ्कर) या संस्कृत श्लोकाचा अर्थ असा होतो की जो आपले कल्याण करतो तो शंकर होय.
सर्वप्रथम ज्ञान हे भारतीय सप्तऋषींना भगवान शिवाने दिले. भगवान शिव हे सर्व सृष्टीचे कारण आहेत. रुद्र हे शिव शंकराचे वेदांतील नाव आहे. पार्वती त्यांची अर्धांगिनी (शक्ती) आहे. आणि स्कंद आणि गणेशही त्यांची मुले आहेत. भगवान ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली व भगवान विष्णू हे ह्या सृष्टीचे पालन करतात, परंतु विश्वाचे कल्याण हे भगवान शंकरा मुळेच होणार आहे.
सृष्टीचा संहार आणि विघटन हे भगवान शंकरांच्या अधिपत्याखाली आहे, कारण ते तमोगुणाचे कारक आहेत. नित्य नियमित जन्म-मरण चक्राची रूपके म्हणजेच त्रिदेव आहेत. भगवान शंकराच्या विविध रूपांमध्ये उमा-महेश्वर, अर्धनारीश्वर, पशुपति, कृतिवास, दक्षिणमूर्ती आणि योगीश्वर इत्यादी रूपे प्रसिद्ध आहेत. शिवजी हे योगी मानले जातात आणि शिव शंकराची पूजा लिंग स्वरूपात केली जाते.
महाशिवरात्रीची प्राचीनता व महत्व
Antiquity and Importance of Mahashivratri: माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्दशी तिथीला हिंदू धर्मात “महाशिवरात्र ” म्हणतात. प्रत्येक महिन्यातल्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीयुक्त चतुर्दशीला “शिवरात्री” असते. मात्र माघ महिन्यातील शिवरात्रीचा महिमा श्रेष्ठ आहे. महाशिवरात्री हिंदू धर्मातील सर्वात महत्वाचा सण आहे. या दिवशी रुद्राभिषेक करून महाशिवरात्री साजरी केली जाते.
महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व हिंदू बांधव व्रत / उपवास करतात, भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी उपवास संपवतात. उत्तर भारतात हाच दिवस फाल्गुन महिन्यात साजरा केला जातो, तर फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात इंग्रजी महिन्याप्रमाणे येतो.
संस्कृत पौराणिक ग्रंथांमध्ये अग्निपुराण शिव पुराण पद्मपुराण या ग्रंथांमध्ये महाशिवरात्रीच्या व्रताचे महत्त्व सांगितलेले आहे. भगवान शंकराला बेलपत्र खूप प्रिय आहे, म्हणूनच या दिवशी बेलाची पाने वाहून भगवान शंकराची पूजा करावी असे या पूजेचे स्वरूप आहे.
महाशिवरात्रीची आख्यायिका
The legendary Story of Mahashivratri: महाशिवरात्रीला भगवान शंकराने तांडवनृत्य केले होते अशीही एक आख्यायिका प्रचलित आहे. तसेच अजून एक पौराणिक महाशिवरात्री कथा (Mahashivratri Story) आहे.
एक शिकारी होता. तो शिकार करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवीत असे. तो एका रात्री शिकारीला गेला असताना झाडावर चढून बसला होता. ज्या झाडावर बसला होता ते झाड बेलाचे होते, आणि त्या झाडाखाली शिवलिंग होते. शिकार नीट दिसावी म्हणून शिकारी झाडाची पाने तोडू लागला.
कळत नकळत ती बेलाची पाने खालच्या शिवलिंगावर पडत राहिली. पहाटे एक हरीण तिथे आले. शिकारी त्या हरिनावर नेम धरणार तोवर ते हरिण म्हणाले की, मी माझ्या कुटुंबाला भेटून येतो. त्यानंतर हरणाचे सर्व कुटुंब तिथे उपस्थित झाले आणि सगळीच म्हणू लागली “ मला मार परंतु इतरांना सोडून दे “.
हे पाहून त्याला आश्चर्य वाटले. शिकाऱ्याने त्या कुटुंबाला निघून जाऊ दिले व त्यानंतर शिकार करणे सोडून दिले. त्याला कळत नकळत रात्री उपवास घडला, पूजा झाली व व्रत देखील झाले त्यामुळे तो पवित्र झाला. हा व्याध आजही आकाशात दिसून येतो अशी मान्यता आहे.
महाशिवरात्री पूजाविधी / व्रत उपवास
पूजाविधी (Mahashivratri Pooja)
महाशिवरात्रीला सकाळी अभ्यंग स्नान करून शिवलिंगाची विशेष पूजा केली जाते. पंचगव्य म्हणजे गायीचे दूध, तूप, शेण, गोमूत्र आणि दही लावून भगवान शंकराला अभिषेक करतात.
पाणी, गंगाजल, दूध, दही, तूप, मध, गूळ, उसाचा रस असे विभिन्न पदार्थ टाकून विविध मंत्र्यांद्वारे पूजा करणे याला “रुद्राभिषेक” म्हणतात. तसेच धोत्रा आणि बेलाची पाने, पांढरी फुले वाहून पूजा करतात. शिवलिंगावर चक्का थापण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे.
व्रत / उपवास (Mahashivratri Fasting)
महाशिवरात्रीच्या निमित्ताने भाविक व्रत, उपवास करतात. काही शिवभक्त दूध आणि फळे असा आहार घेतात, तर काही भक्त उपवासाचे पदार्थ घरी बनवून आहार घेतात.
स्वत:च्या तब्येतीला जमेल असा आहार घेवून भाविक उपवास व्रत करत असतात. शंकराला प्रसाद अर्पण करण्यासाठी विविध प्रकारचे पदार्थ बनविले जातात. खीर, पंचामृत आणि दुधापासून नैवेद्यासाठी प्रसाद बनवला जातो.
महाशिवरात्री मंत्र (Mahashivratri Mantra)
१. ॐ नमः शिवाय
२. ॐ नमो भगवते रुद्राय नमः
३. ॐ उमा महेश्वराय नमः
४. ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् ।
उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात् ॥
महाशिवरात्री उत्सव
Mahashivratri Celebration: भारताच्या काही राज्यांमध्ये शिवरात्रीच्या रात्री दुधामध्ये भांग मिसळून त्याचे सेवन केले जाते. भारताच्या काही राज्यांमध्ये सुकामेवा वाटून घालतात व मसाला दूध पिण्याची पद्धती ही प्रचलित आहे, यालाच थंडाई असे म्हटले जाते.
दुकानांमध्ये महाशिवरात्रीच्या पूजेसाठी आवश्यक लागणारी सामग्री ही दुकानांमध्ये उपलब्ध करून दिली जाते. भस्म, रुद्राक्ष, रुद्राक्ष माला, शंकरजीची मूर्ती,शिवलिंग, डमरू, त्रिशूल इ.अशा विविध गोष्टी विक्रीसाठी उपलब्ध असतात.
बाजारात तसेच शिव मंदिरांजवळ फुले, हार, नारळ, भस्म,अगरबत्ती,धूप, दही, दुध, आणि बेलाच्या वृक्षांची पाने, पांढरी फुले यांचीही विक्री या दिवशी मोठ्या प्रमाणात होते.
महाशिवरात्रीच्या आधी सात दिवस शिवमंदिरात सप्ताहाचे आयोजन केले जाते. यामध्ये मंदिरात रोज सकाळी काकडा, आरती, भजन, हरिपाठ,कीर्तन, केले जाते. शेवटच्या दिवशी सुद्धा (काल्याच्या दिवशी) म्हणजे शिवरात्रीला भजन आणि कीर्तनाचे आयोजन केले जाते.
तसेच या दिवशी शिवमंदिरात फळे, साबुदाणा खिचडी, खजूर, दुध, असा महाप्रसाद भाविकांना वाटला जातो. महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देखील महाप्रसादाचे ( भंडारा ) आयोजन केले जाते.
भारताच्या विविध राज्यात महाशिवरात्री साजरी करण्याची पद्धत
Ways of celebrating Mahashivratri in different states of India:
- दक्षिण भारत
दक्षिण भारतात महाशिवरात्रीच्या एक दिवस आधी एकभुक्त व्रत केले जाते. म्हणजे एक दिवस आधी एक भोजन केले जाते. रात्री पवित्र जागी झोप घेतली जाते. नदीत स्नान करून शंकराचे दर्शन घेतले जाते. शिवाला कमल पुष्प अर्पण करून तांदुळाच्या खिरीचा नैवेद्य अर्पण केला जातो.
महाशिवरात्रीच्या दिवशी ऋग्वेदातील सूक्ते म्हटली जातात. तुळशीची पाने आणि पायसाचा (खिरीचा) नैवेद्य व यजुर्वेदाचे पठण, बेलाची पाने आणि तीळ घातलेला भाताचा नैवेद्य आणि सामवेदाचे पठण, निळी कमळ पुष्पे वाहून साध्या अन्नाचा नैवेद्य आणि अथर्ववेदाचे पठण केले जाते.
- काश्मीर
काश्मीरमध्ये महाशिवरात्री दरम्यान होणारी बर्फवृष्टी ही पवित्र मानली जाते. भक्त शंकराचार्य टेकडी येथील मंदिरात दर्शनासाठी जातात. विशेष यात्रेचे आयोजन केले जाते. मंदिराच्या परिसरात पूजेची सामग्री, कमळाची फुले, अक्रोड यांची दुकाने थाटलेली असतात.
- ईशान्य भारत
आसाम राज्यातील शुक्रेश्वर मंदिर, उमानंद मंदिर या ठिकाणी भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी येतात. यात्रेचे आयोजन करण्यात येते.
- ओरिसा
ओरिसा राज्यात भाविक शिवरात्रीचा उपवास करतात आणि शिव मंदिरात जाऊन दर्शन घेतात.
- उत्तर प्रदेश
उत्तर प्रदेशातील वटेश्वर मंदिरात शिवरात्री निमित्त भाविक राजस्थान, मध्य प्रदेश येथून पाण्याची कावड घेऊन पोहोचतात आणि शिवाला अभिषेक करतात. मध्य हिमालयात या दिवशी यात्रा भरते.
भारतातील बारा ज्योतिर्लिंगांचे स्थान
भगवान शिवाची सोमनाथ, मल्लिकार्जुन, महाकालेश्वर, ओंकारेश्वर, केदारेश्वर, भीमाशंकर, विश्वेश्वर, त्र्यंबक, वैद्यनाथ, नागेश, रामेश्वर आणि घृष्णेश्वर ही प्रसिद्ध बारा “ज्योतिर्लिंगे” आहेत.
महादेवाला देवांचे देव असेही म्हणतात, कारण त्यांनी वेळोवेळी भक्तांना आपले दर्शन दिले आणि भक्तांच्या आग्रहास्तव नैसर्गिक लिंग स्थापन करून त्या ठिकाणी ठाण मांडले त्यांनाच बारा ज्योतिर्लिंग असे म्हणतात.
संपूर्ण भारतात अवघ्या महाराष्ट्रातच शिवाची पाच ज्योतिर्लिंगे आहेत. प्रत्येक ज्योतिर्लिंगा बाबत भगवान शंकराची एक आख्यायिका आहे.
सौराष्ट्रे सोमनाथंच श्रीशैले मल्लिकार्जुनम्। उज्जयिन्यां महाकालम् ॐकारममलेश्वरम्॥ परल्यां वैद्यनाथंच डाकिन्यां भीमाशंकरम्।
सेतुबंधे तु रामेशं नागेशं दारुकावने॥ वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यंबकं गौतमीतटे। हिमालये तु केदारम् घुश्मेशंच शिवालये॥
महाशिवरात्री यात्रा उत्सव
Mahashivratri Yatra Utsav: महाशिवरात्रीच्या निमित्ताने भारतभरात विविध तीर्थक्षेत्रे, तसेच प्रामुख्याने बारा ज्योतिर्लिंगांच्या स्थानी विशेष यात्रा भरतात.
- सोमनाथ, सोरठ-सौराष्ट्र ( गुजरात )
- मल्लिकार्जुन, श्री शैलम ( आंध्र प्रदेश )
- महाकालेश्वर, उज्जैन ( मध्यप्रदेश )
- ओंकारेश्वर, शिवपुरी ( मध्यप्रदेश )
- केदारेश्वर, केदारनाथ ( उत्तरांचल)
- रामेश्वर, रामेश्वरम / सेतुबंधन ( तामिळनाडू )
- विश्वेश्वर, वाराणसी ( उत्तरप्रदेश )
महाशिवरात्रीच्या दिवशी भरणाऱ्या महाराष्ट्रातील यात्रा
- श्री धान्येश्वर मंदिर, धानेप, ता. वेल्हे, जि. पुणे.
- श्री अगस्ती मंदिर, ता: अकोले, जिल्हा : अहमदनगर
- अंबरनाथ जिल्हा ठाणे, येथील पुरातन शिव मंदिर.
- आरमोरी तालुक्याच्या मुख्यालयाजवळच्या पहाडीवरील महादेवगड मंदिर येथे.
- औरंगाबादपासून ३५ किलोमीटरवर असलेल्या वेरूळ लेण्यांच्या जवळचे गरुडेश्वर मंदिर येथे.
- आष्टीनजीकच्या चपराळा येथील हनुमान मंदिर प्रशांतधाम परिसरातील यात्रा.
- औंढा नागनाथ येथील यात्रा.
- कोल्हापूरपासून १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या कणेरी येथील यात्रा.
- खडकेश्वर, (औरंगाबाद).
- गडचांदूर (चंद्रपूर जिल्हा).
- गडचिरोली जिल्ह्यातल्या कुरखेडा तालुक्यातील खोब्रामेंढा येथील मंदिर परिसरातील यात्रा.
- गडचिरोली जिल्ह्यातल्या कुरखेडा तालुक्यातील अरततोंडी येथील मंदिर परिसरातील यात्रा.
- घारापुरी लेण्यांजवळ (मुंबई) येथील यात्रा.
- घृष्णेश्वर, दौलताबाद-मराठवाडा.
- चामोर्शी तालुक्यातील मार्कंडादेव येथील मार्कंडेश्वर मंदिर परिसरातील यात्रा.
- ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा रेल्वे स्टेशनानजीकचे गंगा गोरजेश्वर देवस्थान परिसरातील यात्रा.
- देवगडजवळची कुणकेश्वरची यात्रा.
- परळी वैजनाथ, बीड जिल्हा.
- पालघर जिल्ह्यातल्या वाडा तालुक्यातील आंबिस्ते गावात असलेल्या नागनाथ मंदिर परिसरात. हे गाव वाडा तालुक्यातील खनिवलीपासून दोन कि.मी.अंतरावर आहे.
- बनेश्वर (पुणे जिल्ह्यातील नसरापूर) येथे.
- भीमाशंकरची यात्रा (ता. आंबेगाव, जि – पुणे. )
- राजापूर शहरानजीक असलेल्या मौजे धोपेश्वर गावातील धूतपापेश्वर देवस्थानाच्या परिसरातली यात्रा.
- वैरागडचे भंडारेश्वर मंदिर परिसरातील यात्रा.
- शिवणी-डोंगरगावजवळील चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रह्मपुरी तालुक्याच्या आवळगाव येथील सुप्रसिद्ध गुरूबाबा
देवस्थान परिसरातील यात्रा. - सांगली जिल्हा कवठे महांकाळ.
- सातारा जिल्ह्यातील लिंब गोवे येथील कोटेश्वर मंदिराच्या परिसरात.
- श्री सिद्धेश्वर रत्नेश्र्वर देवस्थान (लातूर) येथील यात्रा.
- सांगली जिल्ह्यातील करगणी येथे लखमेश्र्वर उर्फ श्रीराम देवस्थान हे प्राचीन मंदिर आहे. करगणी येथे दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त मोठी यात्रा भरते.
महाशिवरात्री या दिवशी सुट्टी असते. त्यामुळे सर्वत्र मंदिर परिसरात गर्दी असते. तसेच असे मानले जाते कि, या दिवशी जो भक्त उपवास करतो, मनापासून भगवान शंकराची आराधना करतो त्यांनाच महादेव प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात.
शिवरात्रीचा उपवास मुली, महिला जास्त प्रमाणात करत असतात. अविवाहित मुलींना या दिवशी व्रत केल्याने त्यांच्या पसंतीचा वर मिळू शकतो, तसेच महिलांना संसार सुख मिळते असे म्हटले जाते.
मित्रानो, आपण शिवरात्रीची माहिती महत्व पूजाविधी वरीलप्रमाणे पाहिले आहे. तुम्ही देखील या दिवशी भगवान शंकराची वर दिल्या प्रमाणे पूजा, उपासना करा आणि महादेवांना प्रसन्न करून तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करून घ्या.
महाशिवरात्री निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा ! ( happy mahashivratri 2024 )
धन्यवाद!
हे देखील वाचा : अक्षय तृतीया-वैशाख शुद्ध तृतीया माहिती