श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा
| सर्व सुखाची लहरी, ज्ञानाबाई अलंकापुरी |
इंद्रायणीच्या तीरावरीर आळंदी गावामध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा कार्तिक वद्य षष्ठी ते अमावस्येपर्यंत साजरा केला जातो. यातील प्रत्येक दिवसाला आगळेवेगळे महत्त्व आहे.
कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा ११ डिसेंबर २०२३ रोजी ७२७ वा संजीवन समाधी सोहळा संपन्न होणार आहे. त्यानिमित्त अखंड हरीनाम साप्ताह सामुदायिक ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा चे आयोजन मंगळवार दिं ५ डिसेंबर ते १२ डिसेंबर रोजी आयोजन केले आहे.
दैनंदिन कार्यक्रम – पहाटे ४ ते ६ काकड आरती / सकाळी ६ ते ७ विष्णूसहस्रनाम / सकाळी ७ ते १० ज्ञानेश्वरी पारायण /सकाळी १०.३० ते १२.३० हरिकीर्तन / दुपारी १ ते ४ भोजन व विश्रांती / दुपारी ४ ते ६ श्री संत ज्ञानेश्वर महाराज जीवनचरित्र कथा / सायं ६ ते ७ हरिपाठ / रात्री ७ ते ९ हरिकीर्तन.
संतवर्य ज्ञानदेवांनी वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी, आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या काठी संजीवन समाधी घेतली (कार्तिक वद्य त्रयोदशी, शके १२१८, दुर्मुखनाम संवत्सर, इ.स.१२९६, गुरुवार). हा ‘ज्ञानसूर्य’ मावळल्यानंतर अवघ्या वर्षभरात निवृत्ती, सोपान व मुक्ताबाई या त्यांच्या भावंडांनी आपआपली इहलोकीची यात्रा संपवली.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळा अभंग
मंगलमूर्ति सुखधामा | भक्ताचिया कल्पद्रुमा | निवृत्तीया पुरुषोत्तमा | नमो तुज ||१||
विद्यासागरा वैरागरा | संकटी माऊली ज्ञानेश्वरा | भरीत दाटले अंबरा | तो तू योगेश्वरा मोक्षदायी ||२||
मति चालविली रसाळ | संत श्रोतयां केला सुकाळ | दिधले पुरुषार्थाचे बळ | ते तूं केवळ संजीवन ||३||
अमृतानुभव आनंदलहरी | ग्रंथ सिध्द केला ज्ञानेश्वरी | संस्कृत प्राकृत वैखरी | वदविली माझी ||४||
आता मोक्षाचिया वाटा | पाहिला षडचक्र चोहटा | आज्ञा द्यावी वैकुंठा | ज्ञानदेव म्हणे ||५||
माऊली श्री ज्ञानेश्वर महाराजांनी अंगीकार केलेल्या समाधीविषयी श्री नामदेव महाराज म्हणतात,
देव आणि निवृत्ती यानी धरीले दोन्ही कर ।
जातो ज्ञानेश्वर समाधीस ॥
जाउनी ज्ञानेश्वर बैसले असनावरी । पुढे ज्ञानेश्वरी ठेवीयेली ॥
भीम मुद्रा डोळा निरंजनी लीने । झाले ब्रह्मपूर्ण ज्ञानदेव ॥
ज्ञानराज माऊलींनी अंगीकारलेली समाधी आहे ती ‘संजीवन समाधी’ आहे. माऊली हे ज्ञान, भक्ती, योग या सर्वच क्षेत्रातील राजे आहेत. माऊलींची समाधी संजीवन आहे याचे कारण माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतःच माझी समाधी ही संजीवन आहे असे प्रतिपादिले आहे.
माऊली सांगतात,
समाधी साधन संजीवन नाम । शांती दय सम सर्वाभूती ।
शांतीची पै शांती निवृत्ती दातारु । हरिनाम उच्चारु दिधला तेणे ॥
शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराज म्हणतात,
श्रीज्ञानदेंवे येवुनी स्वप्नांत।
सांगितली मात मजलागी॥१॥
दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा।
परब्रम्ह केवळ बोलत असें॥२॥
अजान वृक्षाची मुळी कंठास लागली।
येवुनिं आळंदी स्थळी काढ वेगी॥३॥
ऐसे स्वप्न होता आलों अलंकापुरी।
जव नंदी माझारी देखिंले व्दार॥४॥
एका जनार्दनी पूर्व पुण्य फळलें।
श्रीगुरु भेंटलें ज्ञानेश्वर॥५॥
हे हि वाचा – PCMC Property Tax Payment: PCMC मालमत्ता कर ऑनलाइन असा भरावा
संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर आणि इतर पवित्र स्थळे
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी या पवित्र यात्रेला भक्त परंपरेत अनन्यसाधारण महत्त्व आहे. माउलींच्या समाधीबरोबरच मंदिरे, आश्रम, तीर्थक्षेत्रे अशा विविध पवित्र स्थळांना वेगळे पावित्र्य प्राप्त झाले आहे. ज्ञानेश्वर महाराजांची समाधी हे त्यांच्या वारकऱ्यांचे पूजनीय स्थान आहे.
संजीवन समाधी मंदिर: इंद्रायणी नदीच्या काठावर वसलेले आळंदी येथे संजीवन समाधी मंदिर आहे. नदीकाठावरील मंदिराजवळचे घाट अतिशय सुंदर आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या एकविसाव्या वर्षी या ठिकाणी समाधी घेतली. या ठिकाणी सुंदर समाधी मंदिर बांधण्यात आले आहे.
हैबत बाबा पायरी : हैबत बाबा हे संत ज्ञानेश्वर महाराजांचे परम भक्त होते. पंढरपूरच्या नामदेवांच्या पायरीप्रमाणेच हैबतबाबांची पायरी आळंदीत आहे.
श्री सिद्धेश्वर: या प्राचीन शिवलिंगाला प्रदेशात ऐतिहासिक महत्त्व आहे, विशेषत: आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या काळापूर्वीचे.
सुवर्ण पिंपळ (सुवर्ण वटवृक्ष) : देहू येथील सुवर्ण पिंपळाचे झाड खूप पुरातन आहे. आळंदीतील समाधी मंदिरात प्रवेश केल्यावर उजव्या बाजूला “सुवर्ण पिंपळ” नावाचा वटवृक्ष आहे. माउलींच्या मातेने समर्पित केलेल्या या प्राचीन वटवृक्षाभोवती भक्त प्रदक्षिणा करतात.
अजानवृक्ष: हे झाड पवित्र मानले जाते आणि त्याच्या सावलीने शतकानुशतके असंख्य यात्रेकरूंना आश्रय दिला आहे. या झाडाच्या मुळांना संत ज्ञानेश्वरांच्या गळाला स्पर्श झाल्याचे सांगितले जाते आणि संत एकनाथ महाराजांच्या दर्शनामुळे ते दूर गेले. या झाडाजवळ भाविक ज्ञानेश्वरीचे अखंड पठण करतात.
श्री एकनाथ पार (पायरी) : संत ज्ञानेश्वर मंदिराजवळील एकनाथ पार खूप प्राचीन आहे. १९७६ मध्ये, चिंचवड येथील एक निष्ठावंत अनुयायी श्री जगन्नाथ गणपती गावडे यांनी या पायरीच्या पुनर्बांधणीसाठी वैयक्तिकरित्या निधी दिला. या पायरीवर संतांच्या पादुकांचे ठसे आहेत.
पुंडलिकाचे मंदिर: पुण्यातील सावकार चिंतामण विठ्ठल मालवतकर यांनी १८५७ मध्ये बांधलेले पुंडलिकाचे मंदिर इंद्रायणी नदीच्या काठी वसलेले आहे.
संत ज्ञानेश्वरांनी चालविलेली भिंत: जेव्हा चांगदेव वाघावर बसून आले. आणि त्यांच्या हातात सर्पाचा चाबूक होता. त्यांचा गर्वपरिहार करण्यासाठी श्री ज्ञानेश्वर महाराज व त्याची भावंडे या भिंतीवर बसून त्यांना सामोरे गेले व त्यांना उपदेश केला.
हे सुद्धा वाचा : कालभैरव जयंती 2023: भगवान कालभैरवांना प्रसन्न करण्यासाठी तिथी, महत्त्व आणि पूजाविधी
आषाढी एकादशी वारी पालखी चे प्रस्थान
आषाढी एकादशीच्या काळात पालखी यात्रा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वार्षिक यात्रेसाठी भाविक आळंदीहून पंढरपूरकडे निघतात. विठोबाच्या दर्शनासाठी पालखीसोबतच लाखो भाविक सुमारे २४५ किलोमीटरचा प्रवास करून पंढरपूरला पोहोचतात.
ह्या वर्षी आषाढी वारी पालखी चे प्रस्थान ११ जून ला झाले होते तर पंढरपूर वरून परतीचा प्रवास ३ जुलै ला सुरु झाला होता.
“आषाढी वारी” म्हंटल की वारकरी आपल्याला डोळ्यांसमोर दिसतात. राम कृष्ण हरि नामाच्या गजरात उत्साहात मग्न झालेले वारकरी हातात टाळ, वीणा झेंडे पताका घेऊन वारीत सहभाग घेतात. देहूहून संत तुकारामांची आणि आळंदीहून संत ज्ञानेश्वरांची पालखीचे प्रस्थान होत असते. विठोबाचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी भाविक देहू ते पंढरपूर यात्रेला निघतात.
तसेच आळंदी ते पंढरपूरचा प्रवास हजारोंच्या संख्येने भाविक करत असतात. वारीमध्ये सातत्याने “माऊली माऊली,” “ज्ञानोबा माऊली तुकाराम,” “विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल,” अशा जयघोष होत असतो. आषाढी वारी हा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा एक भव्य उत्सव असून या काळात सर्वत्र उत्साहाचे आणि आध्यात्मिक उर्जेचे वातावरण निर्माण होते.
हे देखील वाचा : Mahaparinirvan Din 2023: महापरिनिर्वाण दिवस – परिनिर्वाण म्हणजे काय आणि डॉ. आंबेडकरांच्या पुण्यतिथीला महापरिनिर्वाण दिवस का साजरा केला जातो?
कार्तिकी वारी समाधी संजीवन सोहळा आळंदी यात्रा
श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा आणि कार्तिकी एकादशी आळंदी यात्रेनिमित्त आळंदी शहरात भाविक, वारकरी संप्रदाय आणि दिंड्या लाखोंच्या संखेने संपूर्ण भारतातून आळंदीत दाखल होतात. श्री गुरु हैबत्तबाबा यांच्या पायरी पूजनाने मंदिरात समाधी सोहळा उत्सवाला सुरुवात होत असते.
समाधी सोहळा निम्मित्त मंदिरात रोज पहाटे पासून काकडा, आरती, ज्ञानेश्वरी पारायण, भजन, हरिपाठ, हरिकीर्तन तसेच रात्री भोजन प्रसाद असे दैनंदिन कार्यक्रमाचे स्वरूप असते. तसेच आळंदी परिसरात भाविक वारकर्यासाठी काही ठिकाणी सप्ताहांचे नियोजन केले जाते.
सर्वत्र इंद्रायणी परिसरात हरिनामाचा गजर ऐकू येतो. आळंदीमध्ये हा सोहळा, कार्तिकी यात्रा जवळ जवळ ८ ते १० दिवस चालते. समाधी सोहळ्याच्या दिवशी पहाटे दोनपासूनच पवमान अभिषेक, दुधारती, महापूजा, दिंडी प्रदक्षिणा, घंटानाद, महाप्रसाद नैवेद्य, पुष्पवृष्टी, धूपारती, जागर असे धार्मिक कार्यक्रम होतात. नंतर संजीवन समाधी सोहळ्याचे कीर्तन होते. काल्याचा दिवस हा यात्रेचा शेवटचा असतो.
ज्ञानेश्वरांनी लिहिलेले ग्रंथ
अमृतानुभव
चांगदेव पासष्टी
भावार्थदीपिका (किंवा ज्ञानेश्वरी) – या ग्रंथाचा शेवट पसायदान या नावाने ओळखला जातो.
स्फुटकाव्ये (अभंग, विराण्या, आदि.)
हरिपाठ (श्री ज्ञानदेव हरिपाठ)
श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी देवाची ऑफिशिअल सोशल मिडिया माध्यमे
वेबसाईट: https://alandimauli.com/
युट्युब: https://www.youtube.com/c/SHREESAINTDNYANESHWARMAHARAJMANDIRSANSTHAN
इन्स्टाग्राम: https://www.instagram.com/santdnyaneshwarmaharaj/
फेसबुक: https://www.facebook.com/maulialandiweb
सोनी लिव ओटीटी प्लेटफॉर्म वर श्री ज्ञानेश्वर माउली टीव्ही सिरीयल : https://www.sonyliv.com/shows/dnyaneshwar-mauli-1700000796
पीएमपीएमएल बस सेवा मार्ग टाईम टेबल कार्तिकी सोहळा आळंदी २०२३
संत श्री ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा आणि कार्तिक एकादशीच्या शुभ मुहूर्तावर, पीएमपीएमएल ने सर्व नागरिकांना ०६/१२/२३ ते १२/१२/२३ या कालावधीत जादा बस व्यवस्थेचा लाभ घेण्याचे आवाहन केले. प्रवाशांच्या सोयीसाठी या कालावधीत एकूण ३४२ बसेस सुरू राहणार आहेत. स्वारगेट, हडपसर, पुणे स्थानक, मनपा भवन, निगडी, पिंपरी, चिंचवड, देहूगाव, भोसरी, रहाटणी या स्थानकांवरून आळंदी पर्यंत बसेस धावतील. पीएमपीएमएल सर्व संबंधित भाविक आणि नागरिकांना या बस व्यवस्थेचे लाभ घेण्यासाठी विनंती करते.
|| राम कृष्ण हरी || श्री संत ज्ञानेश्वर महाराज की जय. इंद्रायणी तीरी माऊली समाधी सोहळा होत आहे. १० लाख वर भाविक दर्शनसाठी दरवर्षी येतात. सर्वत्र नाम संकीर्तन सोहळे चालू असतात. आळंदी ची गावजत्रा पण याच सोहळ्यात होते. बाल गोपाळ यांना खेळण्याची दुकाने, खाद्यपदार्थ स्टाल आणि इतर अनेक वस्तू , कपडे विक्री साठी उपलब्ध असतात.
जवळच गजानन महाराज मठ आहे, त्याचबरोबर देहू गाव मध्ये संत तुकाराम यांचे गाथा मंदिर आहे. थोड्याच अंतरावर तुळापुर येथे संभाजी महाराज यांचे समाधी स्थळ देखील आहे. एकंदरीत आळंदी सोहळ्यामध्ये आपण भरपूर आध्यात्मिक सेवेबरोबर पुण्याईने समृद्ध होतो. त्यामुळे सर्वांनी आवर्जून श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ११ डिसेंबर २०२३ रोजी होणाऱ्या ७२७ व्या संजीवन समाधी सोहळ्यास यावे.