दत्त जयंती उत्सव वेळ
Dattatreya Jayanti 2023: ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे एकत्रित अवतार म्हणून ओळखले जाणारे भगवान दत्तात्रेय यांची जयंती २६ डिसेंबर २०२३ रोजी साजरी करण्यात येत आहे. या दिवशी पहाटे ५ वाजून ४६ मिनिटांनी पौर्णिमेला प्रारंभ होत आहे आणि समाप्ती २७ डिसेंबरला सकाळी ६ वाजून २ मिनिटांनी होणार आहे. हिंदू पंचागानुसार मार्गशीर्ष पोर्णिमा या दिवशी दत्त जयंती साजरी केली जाते. या दिवशी भगवान दत्तात्रेय यांचा जन्म दिवस हा दत्त जयंती म्हणून साजरा करतात.
पूजेची शुभ वेळ : 26 डिसेंबर 2023 सकाळी 09:46 ते दुपारी 12:21 पर्यंत
दुपारचा पुजा मुहूर्त : 26 डिसेंबर 2023 दुपारी 12:21 ते 01:39 पर्यंत
संध्याकाळी पूजा मुहूर्त : 26 डिसेंबर 2023 संध्याकाळी 07:14 ते रात्री 08:00 पर्यंत
मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव साजरा केला जातो. दत्त म्हणजे निर्गुणाची अनुभूती. विशेषत: दत्त जयंती हि डिसेंबर महिन्यातच येते.
दत्त जयंती या दिवशी मंदिर व परिसरात रोषणाई केली जाते. हार फुलांचे तोरण लावली जातात. ठीक ठिकाणी पारायण, भजन, किर्तनाचे आयोजन केले जाते. या दिवशी दत्त गुरुंना सुंठवड्याचा प्रसाद दाखवून भक्तांमध्ये वाटप करावा. दत्ताला पिवळे फुलं आणि पिवळ्या रंगाची मिठाई, फळे अर्पित करतात.
संध्याकाळच्या दत्ताचा जन्म वेळी जन्माचे कीर्तन असते. जन्मा नंतर पालखीतून भगवान दत्तात्रेय यांची मिरवणूक निघते. दत्त जयंती निमित्त अनेक दत्त मंदिरामध्ये दत्त जन्म साजरा झाला की भंडार्याचेही आयोजन केले जाते. दानशूर व्यक्ती महाप्रसाद अन्नदान वाटपाचा कार्यक्रम करतात. या दिवशी अवधूत गीता पाठ केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते. तसेच भगवान दत्तात्रेयांची पूजा केल्याने सुख, समृद्धी, वैभव मिळते.
गुरुदत्त जयंती निमित्त गुरुचरित्र पारायण सोहळा
बहुतांश दत्त मंदिरे किंवा स्वामी समर्थ महाराज मठ या ठिकाणी दत्त जयंती च्या अगोदर गुरुचरित्र पारायण वाचन सप्ताह आयोजित करतात. दत्त उपासक आणि स्वामी भक्त महिला पुरुष सेवेकरी सकाळी ग्रंथ पुजन करून त्याचबरोबर सामुदायिक संकल्प सोडून ग्रंथ वाचन सुरु करतात. पुढील सात दिवस ठराविक अध्याय दररोज वाचन करून शुद्ध आहार, विचार आणि ठरवून दिलेल्या आचरण नियमाप्रमाणे गुरु सेवा करायची असते.
कलियुगातील संसारिक जीवनात अनंत अडचणी सुख दु:खे मनुष्याला भोगावी लागत असतात. पूर्व जन्म कर्म फळ, पितृदोष, शारीरिक, मानसिक व्याधी, आर्थिक समस्या तसेच इतरही अनेक भौतिक सुखे इत्यादी मध्ये मनुष्य जीवन व्यतीत करत असतो. हे मानवी जीवनचक्र सुलभ होऊन गुरुबळ मिळावे, आध्यत्मिक मार्गाने ईश्वराची सेवा घडावी आणि आपल्या जीवनातील दुखः हरण होवून जास्तीतजास्त सुख लाभावे यासाठी धार्मिक परंपरेनुसार गुरुचरित्र पारायण करून दत्त जयंती सोहळा मनोभावे केला जातो.
आपणही या सोहळ्या मध्ये भाग घेवून गुरुचरित्र पारायण सेवा करू शकता, यासाठी आपल्या जवळच्या दत्त मंदिर समिती किंवा स्वामी समर्थ महाराज मठ या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देवून अधिक माहिती घेवू शकता.
हे देखील वाचा : Margashirsha 2023: मार्गशीर्ष महिना महत्व गुरुवार व्रतकथा मराठी माहिती
भगवान दत्तात्रेय स्वरूप
दत्तात्रेय हा देव आहे जो दैवी त्रिमूर्ती ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांचा अवतार आहे . दत्त या शब्दाचा अर्थ “दिलेला” आहे, दत्ताला असे म्हटले जाते कारण दैवी त्रिमूर्तीने गुरू अत्री आणि माता अनुसूया या ऋषी जोडप्याला पुत्राच्या रूपात “दिले” आहे. तो गुरु अत्र्यांचा पुत्र आहे, म्हणून त्याचे नाव “अत्रेय” आहे. हिंदू धर्माचे पहिले गुरु म्हणून दत्तात्रेयांना समजले जाते.
भारतात किती दत्त मंदिरे आहेत?
दत्तसंप्रदायाचा प्रभाव हा मुख्यत: महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यांमध्ये मोठय़ा प्रमाणावर पाहायला मिळतो. श्रीपाद श्रीवल्लभ, नृसिंह सरस्वती, अक्कलकोटचे स्वामी समर्थ, वासुदेवानंद सरस्वती अर्थात टेंबेस्वामी असे अत्यंत उच्चकोटीचे साधक याच परिवाराचा भाग आहेत आणि महाराष्ट्राबाहेरही दक्षिण भारतात त्यांची विविध मंदिरं असून नित्यनियमाने तेथे पूजा अर्चना केली जाते. महाराष्ट्रातील आणि जवळपासच्या राज्यांतील दत्ताची तीर्थक्षेत्रे पाहूयात.
महाराष्ट्रात आणि दक्षिण भारतातील प्रमुख दत्त तीर्थक्षेत्र खालीलप्रमाणे –
१) माहुर – किनवट तालुका, जि. नांदेड ( माहूरगड हा रेणुकामाता साठी देखील प्रसिद्ध आहे )
२) औंदुबर – पलूस तालुका, जि. सांगली
३) गाणगापूर – अफजलपूर तालुका, गाणगापूर कर्नाटक
४) नृसिंहवाडी – शिरोळ तालुका, जि. कोल्हापूर ( नरसोबाची वाडी )
५) कुरवपूर – कृष्णा-भीमा नद्यांचा संगम – रायचूर जि. कर्नाटक-आंध्रा सीमा भाग ( ‘ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ‘ मंत्र उच्चार या ठिकाणी झाला )
६) श्री क्षेत्र पीठापूर- पूर्व गोदावरी जिल्हा, आंध्रप्रदेश. श्रीपादांचे जन्मस्थान (दक्षिण काशी )
७) अक्कलकोट – (सोलापूर,महाराष्ट्र) ( स्वामी समर्थ महाराज – दत्त अवतार )
श्री दत्ताचा पाळणा
श्री गुरुदेव दत्त जन्म कथा आणि त्या अनुषंगाने पाळणे हे वेगवेगळ्या स्वरुपात उपलब्ध आहेत. ते पुढीलप्रमाणे
दत्त पाळणा पहिला प्रकार –
पहिल्या दिवशी पहिला दिवस
ब्रह्मा विष्णू आणि महेश खास
अनुसयापोटी आले जन्मास
जो बाळा जो जो रे जो ||
दुसऱ्या दिवशी झाला आनंद
नाचू लागले मुनी नारद
चंदन बुका लाविला गंध
दत्तं बाळाचे चरण वंदीन
जो बाळा जो जो रे जो ||
तिसऱ्या दिवशी आनंद मोठा
स्वर्ग कैलासी वाजली घंटा
पाची अमृत सोन्याच्या ताटा
नगरजनांसी सुंठोडा वाटा
जो बाळा जो जो रे जो ||
चवथ्या दिवशी चंद्रपूजेचा
प्रकाश पडला महाली सूर्याचा
नवलक्ष तारे प्रकाश चंद्राचा
जसा झळकतो हिरा रत्नांचा
जो बाळा जो जो रे जो ||
पाचव्या दिवशी दत्त दिगंबर
सर्वांगाशी ती विभूती सुंदर
शंख चक्र गदा घाली अलंकार
गळा शोभे सुमनांचे हार
जो बाळा जो जो रे जो ||
सहाव्या दिवशी नारद बोले
अत्रि ऋषींचे भाग्य उजळले
गुरुदत्त जन्मास आले
पंचामृत तिथे वाटले
जो बाळा जो जो रे जो ||
सातव्या दिवशी हिंडता वन
केळी नारळ चाफा चंदन
नाच मांडला मोर हंसान
जो बाळा जो जो रे जो ||
आठव्या दिवशी कल्पतरुला
आसन बघा खाली बसण्याला
कामधेनु नित्य सेवेला
जो बाळा जो जो रे जो ||
नवव्या दिवशी बोले गणपती
औन्दुबरा खाली दत्त बैसती
दत्ता मागुनी वृक्ष पुजती
तया होई पुत्र संतंती
जो बाळा जो जो रे जो ||
दहाव्या दिवशी स्नान काशीला
अन्न प्रसाद माहूर गडाला
स्मरण केले केदार लिंगाला
प्रत्येक दिवशी हा नेम चालविला
जो बाळा जो जो रे जो ||
दत्त पाळणा दुसरा प्रकार –
जो जो जो जो रे सुकुमारा । दत्तात्रया अवतारा ॥धृ॥
कमलासन विष्णू त्रिपुरारी । अत्रिमुनीचे घरी ।
सत्त्व हरु आले नवल परी । भ्रम दवडिला दुरी ॥१॥
प्रसन्न त्रिमूर्ति होऊनी । पुत्रत्वा पावुनि ।
हर्ष झालासे त्रिभुवनी । राहे ॠषिचे सदनी ॥२॥
पालख बांधविला सायासी । निर्गुण ऋषिचे वंशी ।
पुत्र जन्माला अविनाशी । अनसूयेचे कुशी ॥३॥
षट्दश नामासी आधार । दत्तात्रय अवतार ।
कृष्णदासासी सुख थोर । आनंद होतो फार ॥४॥
जो जो जो जो रे मुनिवर्या । स्वामी दत्तात्रया ॥
सांगुनि पूर्वीचा निजपर्या । हालविती अनुसूया ॥धृ॥
असतां निजसदनीं अत्रिमुनी । मागितलें मज पाणी।
मुसळ थांबविलें तेचि क्षणीं । ऐकुनि मुनिची वाणी ॥१॥
नारद मुनिनें तें पाहुनि । सांगितलें सुरसदनीं।
हरि-हर – ब्रह्मांच्या त्रैपत्नी । क्षोभविल्या अभिमानी ॥२॥
त्यांनी आपुलाले दाटुले । छळणासी धाडिले ।
त्यांहीं अडवुनिया मज वहिले । भिक्षेसी भागितले ॥३॥
मग म्यां तीर्थातें शिंपिले । तिन्ही बाळे केले ।
भोजन घालुनिया निजवीले । संवत्सर बहु गेल ॥४॥
उमा सावित्री लक्ष्मी । आल्या आमुच्या धामी ।
त्यांनी मागितले निजस्वामी । सांडुनि आपुली मी मी ॥५॥
मग म्यां दाखविले देवत्रय । तो तूं दत्तात्रय ।
निरंजनासि आश्रय । सखया तुझा होय ॥६॥ जो जो ॥
दत्त पाळणा चौथा प्रकार –
जो जो जो रे जो जो जो । तू मी ऎसे उमजो ॥धृ॥
प्रेम पालख दत्तात्रय । हालविते अनसुया ।
बोधुनि निजरुप समजाया । भवभ्रम हा उडवाया ॥१॥
रजोगुणी तू ब्रह्माया । श्रमलासी तान्हया ।
सुखे निज आता अरे सखया । धरी स्वरुपी लया ॥२॥
तमोरुपे तू सदाशिवा । विश्रांति घे देवा ।
धरि रे स्वरुपी तू भावा । संहारिता विश्वा ॥३॥
विष्णू सात्त्विक तू अहंकार । दैत्यांचा संहार ।
करिता श्रमलासी अपार । आता समजे सार ॥४॥
ऎसा आनंदे पाळणा । मालो गातसे जाणा ।
सदगुरुकृपेने आपणा । दत्ता निरंजना ॥५॥
दत्ताची आरती ( Datta Aarti )
त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा ।
त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा ।
नेती नेती शब्द न ये अनुमाना ॥
सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना ॥
जय देव जय देव जय श्री गुरुद्त्ता ।
आरती ओवाळिता हरली भवचिंता ॥
सबाह्य अभ्यंतरी तू एक द्त्त ।
अभाग्यासी कैची कळेल हि मात ॥
पराही परतली तेथे कैचा हेत ।
जन्ममरणाचाही पुरलासे अंत ॥
दत्त येऊनिया ऊभा ठाकला ।
भावे साष्टांगेसी प्रणिपात केला ॥
प्रसन्न होऊनि आशीर्वाद दिधला ।
जन्ममरणाचा फेरा चुकवीला ॥
दत्त दत्त ऐसें लागले ध्यान ।
हरपले मन झाले उन्मन ॥
मी तू पणाची झाली बोळवण ।
एका जनार्दनी श्रीदत्तध्यान ॥
दत्त अभंग ( Datta Abhang )
- निघालो घेवून दत्ताची पालखी…. (Nighalo Ghevun Dattachi Palakhi…..)
निघालो घेवून दत्ताची पालखी
आम्ही भाग्यवान आनंद निधान, डुलते हळूच दत्ताची पालखी || धृ ||
रत्नाची आरास साज मखमलीची
त्यावरी सुगंधी फुले गोड ओळी, झुळूक कोवळी चंदना सारखी || १ ||
सात जन्माचि हो लाभली पुण्याई
म्हणुनी जाहलो पालखीचे भोई, शांतमय मूर्ती पाहते सारखी || २ ||
वात वळणाची जवालागे ओढी
दिसते समोर नरसोबाची वाडी, दोलीयात गंगा जाहली बोलकी || ३ ||
……………………………………………………..
- दत्त दर्शनाला जायचं जायच…. (Datta Darshanala Jayach Jayach…..)
दत्त दर्शनाला जायचं जायचं
आनंद पोटात माझ्या मावेना || धृ ||
गेलो गाणगापुरी थेट घेतली दत्ता ची भेट
या या डोळ्याची हौस पुरी होईना होईना || १ ||
रूप सावळे सुंदर गोजिरवाणी मनोहर
या या नजरेस आणि काही येईना || २ ||
रुती नाथ पांडुरंग दत्त गारुडी अभंग
या भजनाची हौस पुरी होईना होईना || ३ ||
नजर बंदीचा हा खेळ, खेळे सदगुरू प्रेमळ
खेळ खेळीता खेळ पुरा होईना || ४ ||
……………………………………………………
- प्राणीयासी मंत्र सोपा, दत्त दत्त वाचे जपा….. (Praniyasi Mantra Sopa, Datta Vache Japa…)
प्राणीयासी मंत्र सोपा, दत्त दत्त वाचे जपा || धृ ||
आणिक गे साधन, दत्त नामे घडे ज्ञान || १ ||
न लगे योग याग पट्टी, दत्ता वाचुनी नेणे काही || २ ||
एका जनार्दनी वेधले मन, मन हे झाले उन्मन || ३ ||
दत्त श्लोक
भवपाशविमुक्ताय दत्तात्रेय नमोऽस्तुते।। 1।। जराजन्मविनाशाय देहशुद्धिकराय च। दिगम्बरदयामूर्ते दत्तात्रेय नमोऽस्तुते।।
गुरू ब्रह्मा गुरू विष्णु, गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नम:….
दत्त मंत्र
श्री गुरुदेव दत्त…
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा….
हे सुद्धा पाहा – Champa Shashti 2023: चंपाषष्ठी मराठी माहिती स्टेटस शुभेच्छा नैवेद्य
दत्त जयंती दिवशी दत्त गुरूंचा आवडता नैवद्य
दत्त गुरूंच्या नैवद्यात ह्या खास गोष्टी हव्याच कोणत्या त्या पाहूयात.
सर्वप्रथम घेवड्याची भाजी नैवद्यात असावी. हि भाजी दत्त गुरुंना अतिशय प्रिय आहे. ( कांदा लसून विरहीत भाज्या असाव्यात ) पिवळा बटाटा भाजी , मुगाची पातळ भाजी, साधी पोळी – पुरी, भात, कोबीची पिवळी भाजी, चनाडाळ घातलेली भाजी, मुगडालीची पिवळी खिचडी,डाळभात, मसालेभात, तूरडाळ पिवळी खिचडी, साधा पुलाव,आमटी आणि कढी- पिवळी डाळीची आमटी,मुगाचे डाळीचे वरण,ताकाची पिवळी कढी,कडधान्याची आमटी, गोड पोळी, किंवा आंब्याचा शिरा, गोड शेवयांची खीर,पिवळ्या जिलेबी,मोतीचूर लाडू,चटणी, कोशिंबीर,लोणचे पापड इ.नैवद्य नेहमी केळीच्या पानावरच वाढवावेत.
वरील प्रमाणे नैवद्य दाखवणे शक्य न झाल्यास काही हरकत नाही, दत्त महाराजांना भक्तांनी मनापासून बनवलेले अन्न पदार्थ गोड व प्रिय असते. म्हणतात ना देव भक्तीचा भुकेला म्हणूनच आपण दत्त जयंतीला मनापासून दत्त महाराजांची सेवा भक्ती करणे महत्त्वाचे आहे.
दत्तगुरूंचे सोळा अवतार कोणते?
दत्त गुरुचे अवतार किती आणि कोणते हे खूप लोकांना माहित नाही. दत्त गुरुनी वेगवेगळ्या सोळा अवतारात संपूर्ण भारत भ्रमण केले. चला तर आपण दत्त महाराजांचे सोळा अवतार पुढे पाहूयात.
१.’योगिराज’
२.’अत्रिवरद’
३.’दत्तात्रेय’
४.’कालाग्निशमन’
५.’योगिजनवल्लभ’
६.’लिलाविश्वंभर’
७.’सिद्धराज’
८.’ज्ञानसागर’
९.’विश्वंभरावधूत’
१०.’मायामुक्तावधूत’
११.’ॐ मायायुक्तावधूताय’
१२.’आदिगुरू’
१३.’शिवरूप’
१४.’देवदेवेश्वर’
१५.’दिगंबर’
१६.’कमललोचन’.
दत्त जयंती शुभेच्छा स्टेटस
भगवान दत्तात्रेय यांचा हा जन्मदिनाचा सोहळा भक्त भाविक मोठ्या उत्साहात साजरा करतात. या दत्त जयंती निमित आपल्या दिवसाची सुरुवात प्रियजनांना, मित्रमंडळींना आप्तेष्टांना आणि नातेवाईकांना खास दत्त जयंतीच्या शुभेच्छा देऊन तुम्ही नक्कीच करू शकता.
हे देखील पाहा – Merry Christmas 2023: ख्रिसमस डे २५ डिसेंबरलाच का साजरा करतात?
या दिवसानिमित्त महाराष्ट्र आणि देश भरातील दत्त मंदिरे सजलेली असतात. भगवान दत्त हे देखील विष्णूचा एक अवतार मानला जातो. त्यामुळे दत्त जयंतीचा दिवस सोशल मीडीयात WhatsApp Status, Facebook Messages, HD Images, Greetings शेअर करून तुम्ही नक्की साजरा करू शकाल. धन्यवाद.
खूप छान.माहिती, फोटो व ईतर सर्व गोष्टी…दत्त जयंती उत्सव साजरा केला जातो आणि तो वर्षोनुवर्षे असाच केला पाहिजे..जय श्री गुरुदेव दत्त..
|| अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त || श्री स्वामी समर्थ महाराज की जय ||
खूप छान वाटले